Ad will apear here
Next
एबारो बारो - सत्यजित रे


कालपासून ‘एबारो बारो’ हा सत्यजित रे (राय) यांचा कथासंग्रह - ज्याचा अनुवाद विलास गिते यांनी केला आहे वाचत होते. ‘एबारो बारो’ म्हणजे आणखी बारा! साकेत प्रकाशनानं १९९२ साली प्रकाशित केलेला हा अनुवाद आजही तितकाच ताजा वाटतो.

विलास गिते यांची आणि आमची (मी आणि अच्युत गोडबोले) भेट अहमदनगर इथे एका कार्यक्रमात झाली होती. ते आमच्या कार्यक्रमाला आवर्जून आले होते. त्यांची ओळख आयोजकांनी जेव्हा करून दिली, तेव्हा त्यांचं साधेपण बघून मी थक्क झाले. खरं तर त्या भेटीत त्यांनी प्रेमानं ‘एबारो बारो’ हे पुस्तक भेट दिलं होतं; पण वाचायला अखेर आज उजाडला.

विलास गिते यांनी इतका सुरेख अनुवाद केला आहे, की मूळ तपशील कधी वाचता आला नाही तरी त्याचं दुःख नाही. विलास गिते हे महाराष्ट्रातले अत्यंत आघाडीचे आणि महत्त्वाचे अनुवादक आहेत. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांचा केलेला अनुवाद असो वा सत्यजित रे यांच्या कथांचा, वाचक त्यात पूर्णपणे गुंगून जातो. नाही तर काही अनुवाद इतके कोरडे असतात, की ते वाचताना त्यात समरस होताच येत नाही.

‘एबारो बारो’ हा बारा कथांचा कथासंग्रह! यातली ‘गणिताचे सर, गुलाबीबाबू आणि टिपू’ ही पहिलीच गोष्ट मनाला रंजकपणे आपल्याकडे खेचते; पण त्याचबरोबर ती डोक्याला ताणही देते. एका नऊ-दहा वर्षांच्या मुलाच्या भावविश्वारत पुस्तकांनी प्रवेश केलेला असतो. दिसतील ती पुस्तकं वाचता वाचता टिपूला (तर्पण) परिकथा आवडायला लागतात. फॅन्टसीच्या विश्वाचतला थरार, अद्भुतरम्यता त्याला आवडायला लागते; मात्र नव्यानं गणित शिकवायला आलेले गुलाबीबाबू हे शिक्षक त्याला अशा पद्धतीचं वाचन काहीही उपयोगाचं नाही सांगून त्याचं वाचन बंद करतात. या गोष्टीचं पूर्ण कथानक मी सांगत नाही; पण फॅन्टसी आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, तीच आपल्याला अनेक गोष्टीतून कशी तारू शकते, हे खूप तरल पातळीवर सत्यजित रे म्हणजेच विलास गिते वाचकाला सांगतात.

याच पुस्तकातली ‘साधनबाबूंचा संशय’ ही कथा संशयावर आधारित असून, कधी खुसखुशीतपणा, तर कधी गूढ वातावरण, कधी हेरगिरी करावी असंही वाटावं असं सगळं चित्र उभं करत करत या संशयी वृत्तीनं ते स्वतःचं काय नुकसान करतात ते खूपच अनोख्या रीतीनं यात सांगितलं आहे. ‘अंबर सेन बेपत्ता हेातात’ ही कथादेखील अशीच रहस्याची उकल करत करत कशी पुढे जाते आणि कोण कोणाला कशा रीतीनं शह देतं हे अतिशय हलक्याफुलक्या शैलीत सत्यजित रे वाचकाला सांगतात.

‘कःपदार्थ’ नावाच्या कथेत आपण बिनकामाच्या व्यक्तीला कःपदार्थ किंवा कस्पटासमान लेखतो आणि अशा वेळी अशा व्यक्तीही कशा असू शकतात याचं सुंदर चित्रण या कथेत बघायला मिळतं.



यातली ‘गगन चौधरींचा स्टुडिओ’ ही एक गूढकथा असून, शेवटपर्यंत एक थरार आणणारं वातावरण ती आपल्याभोवती तयार करते. सत्यजित रे यांचं वैशिष्ट्य म्हणजे कथेतलं वातावरण हुबेहूब उभं करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. हवेलीचं वर्णन, मिणमिणता उजेड, समोरच्याच्या आवाजातली धार, त्याचा पोशाख, खेचून घेणारं चुंबकीय व्यक्तिमत्त्व आणि स्तब्ध करणारा शेवट या सगळ्यांनी आपण किती तरी वेळ कथानकाच्या वातावरणातून बाहेरच येऊ शकत नाही.

विलास गिते यांनी केलेला सकस अनुवाद हे या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य! तसंच सत्यजित रे यांचं साहित्य का वाचावं असा प्रश्न् मनाला विचारला तर त्याचं उत्तर म्हणजे त्यांचा व्यापक दृष्टिकोन तर त्यांच्या लिखाणातून बोलतोच; पण त्याचबरोबर ते वाचकाची बौद्धिक उंची हळूहळू कशी वाढवतात याचा खुद्द त्या वाचकालाही पत्ता लागत नाही. म्हणूनच मुलांना ही पुस्तकं वाचायला दिलीच पाहिजेत.

ही पुस्तकं लिहिणारे सत्यजित रे कोण होते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. तरीही या पुस्तकाच्या निमित्तानं सांगते. सत्यजित रे किंवा सत्यजित राय हे नाव घेतलं, की भारतीय चित्रपटसृष्टीतला प्रतिभावान दिग्दर्शक डोळ्यासमोर येतो. सत्यजित रे यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलं गेलं. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारासह भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. ३० मार्च १९९२ या दिवशी त्यांना ऑस्कर पारितोषिकानं गौरवलं गेलं.
कधी रवींद्रनाथाचं संगीत आणि साहित्य त्यांना मोहिनी घालत असे, तर कधी मुन्शी प्रेमचंदांचं कथानक ओढ लावत असे. कधी इब्सेनची नाटक त्यांना खेचून घेत, तर कधी स्वतःचे वडील सुकुमार राय यांच्या कथाही त्यांना खुणावत असत. अनेक प्रतिभावंत बंगाली साहित्यिकांच्या कलाकृती त्यांना आवडत असत. या कथानकांमधून त्यांनी स्वतःच बहुतांश चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या.

दिसायला देखणे असलेल्या सत्यजित रे यांची उंची सहा फूट साडेचार इंच इतकी होती. ते केवळ एक उत्तम दिग्दर्शकच नव्हते, तर एक लेखक, संपादक, चित्रकार, छायाचित्रकार, संगीतकार असे सबकुछ होते. त्यांना पुस्तक निर्मिती करताना त्याचा ले-आउट करता येत असे. मुखपृष्ठ असो वा आतली रेखाचित्रं, त्यातही ते माहीर होतेच. कधी ते बंगालीमध्ये कथा, कादंबऱ्या लिहीत, तर कधी रहस्यकथाही लिहीत. त्यांच्या अनेक कथांचं इंग्रजीतही भाषांतर झालं आहे आणि त्या लोकप्रिय झाल्या आहेत. ‘संदेश’ नावाच्या मुलांच्या मासिकाचे ते संपादकही होते.

मराठीतून त्यांचे कथासंग्रह रोहन, साकेत आणि सकाळ प्रकाशनानं केले आहेत. त्यांच्या साहित्याचा मराठीत अनुवाद विलास गिते यांनी केला आहे. तसंच काही पुस्तकांचा अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे. बालसाहित्यात आचार्यांच्या खुनाचं प्रकरण, अनुबिसचं रहस्य, बादशहाची अंगठी, चालत्या प्रेमाचं गूढ, दफनभूमीतील गूढ, देवतेचा शाप, फॅन्टॅस्टिक फेलुदा (रहस्यकथा १२ पुस्तकांचा संच), गंगटोकमधील गडबड, इंडिगो आणि निवडक कथा, जय बाबा फेलूनाथ, कैलासातील कारस्थान, काठमांडूतील कर्दनकाळ, केदारनाथची किमया, मृत्युघर, मुंबईचे डाकू, नंदनवनातील धोका, प्रा. शेंकू यांच्या साहसकथा, रॉबर्टसनचं माणिक, असं असतं शूटिंग, एक डझन गोष्टी असे मोजता येणार नाहीत इतके अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले. आणि सगळेच दर्जेदार!

ही सगळी पुस्तकं पुस्तकांच्या दुकानांत सहजपणे उपलब्ध आहेत. जरूर वाचा. आपल्या मुलांना वाचायला द्या.

- दीपा देशमुख, पुणे
...........
(ही पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QWFTCS
Similar Posts
हरित द्वीपाचा राजा नुकत्याच होऊन गेलेल्या बालदिनी सकाळी सकाळी पं. नेहरूंची अनेक भाषणं वाचली. लिखाणाची महत्त्वाची कामं आटोपली आणि मग ‘मनोविकास’निर्मित ‘हरित द्वीपाचा राजा’ हे सुनील गंगोपाध्याय या प्रख्यात बंगाली लेखकाचं पुस्तक वाचायला घेतलं.
नवं पुस्तक : नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर भीती, गूढता, अतार्किक जग, मनोव्यापार आदी गोष्टींचा समावेश असलेलं साहित्यातलं एक नवं दालन नारायण धारप यांनी वाचकांसाठी खुलं करून दिलं आणि त्यात वाचकांना गुंतवलं. अशा या लोकप्रिय लेखकाबद्दल प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी लिहिलेलं ‘नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर’ हे नवं पुस्तक बुकगंगा पब्लिकेशन्सद्वारे लवकरच प्रसिद्ध होत आहे
लव्ह इन द टाइम ऑफ करोना रोहन प्रकाशनानं नुकताच प्रकाशित केलेला ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ हा कथासंग्रह असून, यात गणेश मतकरी, नीरजा, श्रीकांत बोजेवार, प्रवीण धोपट, मनस्विनी लता रवींद्र, प्रणव सखदेव, परेश जयश्री मनोहर आणि हृषीकेश पाळंदे या लेखकांच्या करोना काळातल्या कथा आहेत.
डायनासोरचे वंशज मी या पुस्तकानं झपाटून गेले, २०११ साली प्रकाशित झालेलं पुस्तक आपण अजूनपर्यंत वाचलं नव्ह.तं याचं खूप खूप वाईट वाटलं. मानसशास्त्राच्या अंगानं प्रवास करणाऱ्या या सगळ्या कथा एका अद्भुत विश्वात मला घेऊन गेल्या. या पुस्तकात एकूण १० कथा आहेत; पण एका दमात या कथा वाचता येत नाहीत. प्रत्येक कथा मेंदूला झिणझिण्या आणते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language